उपळाई बुद्रुक - कशी घडली अधिकाऱ्यांची पंढरी-१।
✍️भाग - १
|
गावाचे मुख्य प्रवेशद्वार |
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यापासून दक्षिणेला माढा-मोडनिंब रोडवर 7 किलोमीटर अंतरावर असलेले सुमारे दहा हजार लोकवस्तीचे,पूर्वी गट ग्रामपंचायत असणारे गाव आता पंधरा ग्रामपंचायत सदस्य असलेले गाव झाले आहे.
पूर्वेला अंजनगाव, ईशान्येला उपळाई खुर्द,उत्तरेला माढा, वायव्येला चिंचोली, पश्चिमेला रोपळे खुर्द व बावी,आग्नेयेला वाफळे तर दक्षिणेला वडाची वाडी हि गावे आहेत.
आपल्या मातीतील अलौकिक बुद्धिमत्तेने देशात प्रसिद्धीला आलेले, एक यशस्वी परंपरा लाभलेलं गाव त्यामुळेच उपळाई बुद्रुक ला स्पर्धा परीक्षेची पंढरी म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
|
विशाल वटवृक्ष |
माढया वरून मोडनिंब ला जाताना उजव्या बाजूला रयत शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालयासमोरील आणि डावीकडील सरळ वाटेने गेले की ओढ्याच्या बाजूलाच असणाऱ्या विशाल वटवृक्षाला पाहिले कि गावाचे वैभव दिसून येते. गावाच्या वेशीजवळ असणारे हनुमान मंदिर ,गावाची तहान भागवणारी दगडी बांधकामातील गावविहिर तर गावाच्या वैभवात आणखीनच भर टाकते. गावाच प्रवेशद्वार म्हणजे भरभक्कम रायगडाच्या प्रतिकृतीचे बुरुज, जणू शिवरायांच्या अस्मितेची आणि शिकवणीची जाण दाखवून देतात. प्रवेशद्वारावर असलेली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा गावाच्या वैभवशाली आणि एकात्मतेची झलकच दाखवून देते.
|
मुख्य रस्ता |
प्रवेशद्वारापासून सरळ जाणारा रस्ता म्हणजे गावातील पूर्वजांच्या दुरदृष्टीकोनाचे एक मूर्त उदाहरणच म्हणावे लागेल.कारण हा मुख्य रस्ता गावाच्या बरोबर मधून जातो.कोणत्याही लोकवस्तीमधून येणाऱ्या प्रत्येक रस्त्याला हा सामावून घेतो. या रस्त्याने गावाचे दोन समांतर भाग झाल्याचा भास होतो.रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने गावकऱ्यांची मनोभावे सेवाच करतात.गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या चौकास क्रांती चौक असे नाव आहे.गावात आठवडी बाजार होत नसला तरी दररोज सकाळी शेतकरी आपापल्या कष्टाच्या घामाने पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी याच चौकात येतो आणि सर्व गावकरीही ते खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करतात. गावात कोणतीही राजकीय सभा, सत्कार,सन्मान, आंदोलन, मोर्चा,सहविचार सभा, सार्वजनिक शिवजयंती, अहिल्याबाई होळकर जयंती,गणेशोत्सव, मिरवणूक हे सगळं याच चौकात.
|
फाईट for Tea lover |
चौकातील मैत्री दृढ करणारं ठिकाण म्हणजे हॉटेल.एकमेकांना हक्कानं फाईट (चार अर्धा कप चहा) मागण्यात एक वेगळ नातं जाणवतं.चहाचा घोट घेता घेता एकमेकांचं सुख दुःख वाटून घेणारे गावकरी पहिले कि शहरातील स्वर्गसुखही फिकी वाटतात.
गावात हिंदू मराठा, मुसलमान, माळी, चांभार ,महार, मांग, चांभार,कोष्टी, कुंभार, नाभिक, ढोर, वाणी,ब्राह्मण, डवरी, गोसावी, कासार, वडार, सोनार, धनगर , परीट, गुरव,जैन,गुजर ,कोळी, जंगम यांसारख्या वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समाजाचे लोक आजही आपापल्या समाजाच्या समुदायानेच एकत्र राहतात.अगदी ठरवून नाही पण एक वैशिष्टय प्रत्येक जातीच्या स्वतंत्र गल्ल्या.कोणत्याही सामाजिक व राजकीय भेदभावाशिवाय एकोप्याने राहतात.
|
द्विभुज गणेश, नंदी व वीरगळ
गावातअनेक ठिकाणी वेगवेगळ्या शिल्पाकृती आणि शौर्याचा वारसा सांगणाऱ्या विरगळ ,शाहिद शंकर शेलार यांचे स्मृतिस्थळ पहायला मिळते. ग्रामदैवत असलेल्या नंदिकेश्वर मंदिरामध्ये दुर्मिळ अखंड द्विभुज गणेश मूर्ती आहे.तेलघान्याचे अवशेेेष आजही पहायला मिळतात. गावात दत्त, नृसिंह, हनुमान, सटवाई, विठ्ठल, राम, महादेव, अंबाबाई, सोमनाथ, गणपती, मरीमाता जीवंत संजीवन समाधी घेतलेले सद्गगुरु समाधी, ज्ञानेश्वर, तुकाराम ,बाळूमामा मंदिर यांसारख्या देवतांची जागृत देवस्थान आहेत.
|
|
अखंड शिवनाम सप्ताह |
गावात दत्त जयंती ,हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री, हरिनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह ,मोहरम , रमजान ईद यांसारखे धार्मिक समारंभ उत्साहात साजरे केले जातात. तर शिवजयंती , गणेशोत्सव , अहिल्याबाई होळकर जयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, रोहिदास जयंती यासारखे सामाजिक कार्यक्रमही आयोजित होतात.
गाव भाग मोठा असला तरी शेती आणि पशुपालनाच्या हेतूने मासोबाचीवाडी ,गावडे वस्ती, कदम वस्ती , गुंड वस्ती, बोकडदर वाडी,भांगे वस्ती ,बेडगे वस्ती ,गायकवाड व झोडे वस्ती, माळी वस्ती, मांजरे वस्ती, बाबर वस्ती, दुचाळ वस्ती, चव्हाण वस्ती यासारख्या वस्त्या ह्या जणू गावाला गस्तच घालत असल्यासारख्या चाहुबाजूनी रक्षण करतात.या वस्त्यावरील लोक शेती व दूधाचा व्यवसाय करुन आपली उपजीविका करतात.
अधिकारी घडवणारे ज्ञानमंदिर
गावाच्या यशस्वीतेचे गमक म्हणजे इथली शिक्षण व्यवस्था आणि त्यातला यशाचा मार्ग म्हणजे रयत शिक्षण संस्थेच असणारे नंदिकेश्वर विद्यालय.
गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सहा तर इतर दोन माध्यमिक शाळा आहेत. याच बरोबर सुमारे दहा अंगणवाड्या ही आहेत.तर शारीरिक बालोपासनेचे धडे देणारी व्यायामशाळाही आहे.
यासोबतच मुक्या जीवांना जीवनदायिनी देण्यासाठी प्राध्यापक विजयकुमार शेटे (आप्पा) देशी गायींसाठी गोशाळा तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते हे अरिंजय गो शाळा चालवत आहेत.
|
मैत्रेय संवाद ग्रुप |
|
हॉलिबॉल व शंकर शेलार प्रतिष्ठान |
सामाजिक कार्य करणाऱ्या मैत्रेय संवाद ग्रुप, हॉलीबॉल संघ, जय हनुमान तालीम संघ, आण्णासाहेब तरुण मंडळ, जय हनुमान मंडळ,शिवावीर मंडळ, शिवरत्न मंडळ, ओम शांती मेडिटेशन केंद्र शिवमुद्रा, राजमुद्रा ,अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान,माजी सैनिक ग्रुप, संत सावता माळी प्रतिष्ठान या सारख्या अनेक सामाजिक संघटनाही आहेत.
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नसून केवळ गावाबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यातून कुणाचा उल्लेख राहून गेला असल्यास अथवा कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏
आपल्या सारखाच एक सामान्य गावकरी
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
पुढील भागात गावाची यशस्वी वाटचाल व सांस्कृतिक परंपरा वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट
हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.
https://riyajatar12.blogspot.com